आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

adminuser • Political • April 21, 2026

पुणे : आमचे पडलेले कार्ड घेतल्याचे सांगून सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटल्याची घटना पाषाण परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शमसुद्दीन उर्फ समीर चाँदसाहेब ककेरी (वय २६, सध्या रा. कीर्ती गार्डन, पाषाण, मूळ रा. कर्नाटक) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ककेरी पाषाण येथील कीर्ती गार्डनमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात तसेच मजुरीचेही काम करतात.

फुटपाथ पेव्हर ब्लॉकचे काम करून १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ककेरी आणि त्यांचा मित्र पाषाणमधील सुतारवाडी परिसरातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ककेरी व त्यांच्या मित्राला अडवले.

“तू आमचे डेबिट कार्ड घेतले आहे,” असे सांगून चोरट्यांनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. झडती घेण्याचा बहाणा करून त्यांनी ककेरी यांना धमकावले व त्यांच्या खिशातील ४० हजारांची रोकड काढून घेतली.

ककेरी यांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरटे सुस रोडच्या दिशेने पसार झाले. ही रक्कम सुरक्षा रक्षक म्हणून मिळालेला पगार व इतर कामाचे पैसे असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव करत आहेत.

get_footer();