आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर गुन्हा

maha360news • Political • April 16, 2026

पुणे : बनावट दस्तऐवज तयार करून भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ६ कोटी ५३ लाख ९२ हजार ४२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत लेखा परीक्षक सुनिल मथुरा काळे (वय ५५, रा. मोहननगर, धनकवडी) यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१७-१८ ते २०२३-२४ या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील वाकी येथे भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था आहे.

या संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर शासनाच्या सहकार विभागाने या पतसंस्थेचे लेखापरीक्षण करून घेतले. त्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता तसेच आर्थिक अपहार आढळून आल्याने लेखा परीक्षकांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतसंस्थेतील २५ संचालक आणि इतरांनी संगनमताने कट रचून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सोने तारण कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, जामीनकी कर्ज, वाहन तारण कर्ज, ठेव तारण कर्ज आदी व्यवहारांमध्ये अनियमितता केल्या.

जमा पावत्यांच्या रकमा रोजकिर्दीत जमा न करणे, बँकेतून रोख रक्कम काढून नोंद न करणे, बँक भरणा दाखवून प्रत्यक्षात रक्कम जमा न करणे, बचत खात्यातून बनावट सहीने रक्कम काढणे, बोगस खर्च दाखवणे तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत गुंतवणूक दाखवून त्याचे कोणतेही पुरावे न ठेवणे असे प्रकार करण्यात आले.

तसेच दैनंदिन शिल्लक कमी असताना जादा रक्कम दाखवून हातातील शिल्लक कमी दाखवणे, रोजकिर्दीची सुरुवातीची शिल्लक कमी दाखवणे अशा विविध प्रकारे खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून ठेवीदारांचा विश्वासघात करत ६ कोटी ५३ लाख ९२ हजार ४२ रुपयांचा अपहार करण्यात आला.

या प्रकरणात वाकी येथील पतसंस्था तसेच ठेवीदार, खातेदार व सभासदांची फसवणूक झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करत आहेत.

get_footer();