आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ऑफिस बॉयला धमकावून ४ लाखांची रोकड लुटली

maha360news • Political • April 14, 2026

पुणे : वाईन शॉपमधील जमा झालेली रोकड मालकाच्या घरी घेऊन जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून ऑफिस बॉयकडून ४ लाख रुपयांची रोकड लुटून नेली.

याबाबत रोहन रवींद्र कांबळे (वय ३१, रा. इंदू निवास, काळेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांनी नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नर्‍हे पोलिसांनी दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बंगलोर-मुंबई महामार्गावरील एच.पी. पेट्रोल पंपासमोर, मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर, १२ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन हे डी.एस.पी. वाईन या मद्य विक्री दुकानात कामाला आहेत. दुकानात जमा झालेली ३ लाख ९९ हजार रुपयांची रोकड घेऊन ते १२ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ओला मोटारसायकलवरून मालकांच्या घरी देण्यासाठी निघाले होते.

बंगलोर-मुंबई बाह्यवळण मार्गावरील नर्‍हे परिसरातील एच.पी. पेट्रोल पंपासमोर दुचाकीस्वार कांबळे यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली आणि ३ लाख ९९ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून चोरटे पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बाह्यवळण मार्गावरील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले असून, त्याआधारे आरोपींचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे पुढील तपास करत आहेत.

get_footer();