आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्राचार्यांकडून खंडणी उकळणाऱ्या पीएसआयसह ३ पोलिसांवर गुन्हा

adminuser • Political • April 9, 2026

पुणे : एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना पोक्सोच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन ७ लाख रुपयांची खंडणी पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या दोन साथीदार पोलीस अंमलदारांनी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने आपल्या पालकांसोबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली. हा प्रकार १८ जुलै ते २८ जुलै २०२५ दरम्यान घडला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी पथकाला तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार सुदाम तायडे व महिला पोलीस अंमलदार (रील स्टार) सोनाली हिंगे यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व जण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अजित बडे सध्या सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दामिनी मार्शल म्हणून कार्यरत असलेल्या सोनाली हिंगे या रील स्टार म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

याबाबत एका प्राचार्यांनी तक्रार दिली आहे. ते धनकवडीत राहतात. जुलै २०२५ मध्ये एका मुलीने तिची मूळ कागदपत्रे परत मिळवण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली होती. नियमानुसार प्रक्रिया सुरू असताना संबंधित तपास अधिकारी अजित बडे, सुदाम तायडे आणि सोनाली हिंगे हे तिघे महाविद्यालयात गेले.

त्यावेळी अजित बडे यांनी विचारले की, “तुम्ही एका मुलीची कागदपत्रे काढून ठेवली आहेत का?” त्यावर प्राचार्यांनी प्रवेशाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्रे आम्ही आमच्याकडे ठेवतो, असे सांगितले.

त्यावर बडे यांनी या विद्यार्थिनीला तुम्ही मेट्रो स्टेशनवर बंदुकीचा धाक दाखवून गाडीत ओढले असल्याची तुमच्या विरोधात तक्रार आल्याचे सांगितले आणि त्यांच्यासमोर एक कागद ठेवला. ती तक्रार वाचल्यानंतर प्राचार्यांनी हे खोटे असल्याचे स्पष्ट केले.

ही मुलगी १८ वर्षांखालील असल्याने प्राचार्यांवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल होईल, अशी भीती दाखविण्यात आली. अटक होईल आणि संस्थेचे नाव बदनाम होईल, अशी धमकी देत १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अखेर तडजोडीनंतर ७ लाख रुपये देण्याचे ठरले. २८ जुलै २०२५ रोजी कॉलेजमधील कर्मचाऱ्यामार्फत संबंधित पोलिसांपर्यंत ८ लाख रुपये पोहोचविण्यात आले.

याबाबत संबंधित मुलीने काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन माहिती दिली. पोलिसांनी आपल्याकडून खोटा अर्ज कसा लिहून घेतला, हेही तिने सांगितले. पोलीस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले.

गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी चौकशी केली. प्राचार्यांना बोलावून मुलीचा तक्रार अर्ज दाखविण्यात आला. त्यावेळी प्राचार्यांनी पोलिसांनी कशाप्रकारे पैसे उकळले याची माहिती दिली.

चौकशीनंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार गुरुवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप तपास करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, अश्विनी जगताप तसेच पोलीस अंमलदार साधना पवार, महेश पाटील, अमित गद्रे, शंकर नेवसे यांनी केली आहे.

get_footer();