आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वन सर्व्हेक्षकाला लाच घेताना अटक

adminuser • Political • March 31, 2026

पुणे : खासगी जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील वन क्षेत्राचे शेरे काढून टाकण्यासाठी एजंटकडून ४ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वन विभागातील वन सर्व्हेक्षकाला सापळा रचून रंगेहाथ पकडले.

उदयसिंग भीमराव कुंभार (वय ४६, सध्या रा. कात्रज, मूळ रा. सातारा) असे या वन विभागातील सर्व्हेक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी कुंभार याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करतात. वडगाव मावळ तालुक्यातील चिखलसेगाव, आपटी, कुणेनामा या गावांमध्ये तक्रारदाराने जमीन खरेदी केली आहे. काही जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर खासगी वनाचे शेरे लागले होते.

हे शेरे काढून टाकण्यासाठी त्यांनी महसूल विभागाकडून ११ ‘रिस्टोर्ड ऑर्डर्स’ मिळवून त्या संदर्भातील नोंदी वन विभागाच्या कागदपत्रांवर घेण्यासाठी अर्ज केला होता. या बाबतची प्रत मिळविण्यासाठी त्यांनी सेनापती बापट रस्त्यावरील उपवनसंरक्षक कार्यालयात अर्ज केला होता.

या अर्जाच्या चौकशीसाठी ते ४ मार्च रोजी वन विभागाच्या कार्यालयात गेले. हे काम वन क्षेत्र सर्व्हेक्षक उदयसिंग कुंभार यांच्याकडे असल्याची माहिती त्यांना मिळाली. कुंभार यांनी ११ आदेशांपैकी ७ आदेशांच्या प्रती कार्यालयात असल्याचे सांगून त्यासाठी ७ लाख रुपयांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदाराने १३ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणीत कुंभार याने तडजोडीअंती ४ लाख रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानंतर अरण्येश्वर येथील पुणे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरसमोर रविवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला.

तक्रारदाराकडून ४ लाख रुपयांची लाच घेताना कुंभार याला पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सतीश वाळके व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहेत.

get_footer();