आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध

adminuser • Political • March 28, 2026

पुणे : हवेली तालुक्यातील किरकटवाडी येथील सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली असून, त्याला एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सुरज महेंद्र नांगरे (वय २१, रा. किरकटवाडी, ता. हवेली) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. सुरज नांगरे याच्याविरुद्ध २०२३ पासून खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, शिवीगाळ, धमकी देणे, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे, दहशत पसरविणे असे ४ गुन्हे दाखल आहेत.

लोकांमध्ये त्याची दहशत असल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यास कोणी पुढे येत नाही. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर काहीही परिणाम झाला नाही. नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविला होता.

पोलीस आयुक्तांनी प्रस्तावाची पडताळणी करून सुरज नांगरे याला चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. गेल्या ३ महिन्यांपासून सुरज नांगरे फरार होता. त्याचा शोध इंस्टाग्राम व फेसबुकच्या माध्यमातून मुंबई, सातारा व पुणे ग्रामीण परिसरात घेण्यात आला.

पोलीस हवालदार संग्राम शिनगारे, स्वप्निल मगर, निलेश खांबे, प्रतिक मोरे यांनी त्याला भोर येथून ताब्यात घेतले. त्याच्यावर एमपीडीए कायद्याचा आदेश बजावून त्याची चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड तसेच पोलीस अंमलदार प्रथमेश गुरव, कैलास केंद्रे, अनिल बारुड यांनी केली.

get_footer();