आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फसवणूक करून फरार झालेले पती-पत्नी जेरबंद

adminuser • Political • March 27, 2026

पुणे : स्वस्तात सोने देतो, असे सांगून सोन्यात गुंतवणूक करायला लावून तिघांची दीड कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक करून फरार झालेल्या पती-पत्नीला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे.

हेमंत दत्तात्रय खरोटे (वय ४५) आणि रुपाली हेमंत खरोटे (वय ३८, रा. बालाजी कृपा, शिवशंभोनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ६१ वर्षांच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या स्टेट बँकेत अधिकारी होत्या.

हेमंत खरोटे व रुपाली खरोटे यांची ‘अवनी ज्वेलर्स’ या नावाने सराफी पेढी आहे. स्टेट बँकेच्या आंबेगाव शाखेत हेमंत खरोटे हा सोन्याचा व्हॅल्युएर म्हणून काम करत असे. त्यातून त्यांची ओळख झाली होती.

फिर्यादी व त्यांचे पती सेवानिवृत्त झाले होते. त्यांना मिळालेली रक्कम सोन्यात गुंतवा, असे हेमंत खरोटे याने सांगितले. सर्व व्यवहार ऑनलाइन होईल, सोन्याचा प्रति तोळा दर कमी आहे, तसेच मेकिंग चार्जेस लागणार नाहीत, असे सांगून त्याने विश्वास संपादन केला.

सुरुवातीला त्यांना १२५ ग्रॅम सोने दिले. त्यानंतर वेगवेगळ्या सोन्याचे दागिने व सोन्याच्या बिस्किटांचे फोटो दाखवून स्वस्तात सोने देतो, असे सांगत वेळोवेळी आश्वासन देऊन १ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपये घेतले.

त्यापैकी केवळ १२५ ग्रॅम सोने देऊन व ७ लाख ९० हजार रुपये परत करून १ कोटी ३४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केली होती. याशिवाय आणखी दोघांची फसवणूक करून ते दोघे फरार झाले होते. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण अधिनियमाचे कलम लावण्यात आले आहे.

आरोपी पुणे शहरातून पसार झाल्यानंतर ९ मोबाईल फोन व १२ सिमकार्ड आलटून-पालटून वापरत होते. त्यांच्या उपलब्ध मोबाईल क्रमांकांचे तसेच सोशल मीडियाचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर ते देशभरातील विविध राज्यांत वावरत असल्याचे दिसून आले.

तपासादरम्यान ते ओला कॅबने प्रवास करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित कॅब चालकाचा मोबाईल क्रमांक, प्रवासाची दिशा यांचा अभ्यास व तांत्रिक विश्लेषण करून सापळा रचण्यात आला. मुंबई-पुणे प्रवासादरम्यान त्यांना पकडून अटक करण्यात आली.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड तसेच पोलीस अंमलदार किरण देशमुख, नरेंद्र महांगरे, राहुल शेडगे, महेश बारवकर, मितेश चोरमोले, मनोज निर्मळे, श्रीकांत कुलकर्णी, सागर बोरगे, अवधूत जमदाडे, सोनाली पिलाणे यांनी पार पाडली.

get_footer();