आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तरुणांना मारहाण करून दहशत माजविणाऱ्यांची काढली धिंड

adminuser • Political • March 21, 2026

पुणे : बँक कर्मचारी व कुरिअर बॉयला मारहाण करून येवलेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या ५ टवाळखोर गुंडांना येवलेवाडी पोलिसांनी पकडून त्यांची धिंड काढली. चौकाचौकात उभे राहणाऱ्या टवाळखोर मुलांना येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी इशारा दिला आहे.

याबाबत मयूर राम गायकवाड (वय २६, रा. स्वामी निवास, सुखसागरनगर, साईनगर, कोंढवा) यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कासट कॉलनीतील गल्ली क्रमांक १२ मध्ये १७ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.

ओंकार राजेंद्र पांचाळ (वय १९, रा. भोलेनाथ चौक, कोंढवा), शिवाजी सोन्या जाधव (वय १९, रा. सिव्हिल स्टॉल, येवलेवाडी), हर्षल मनोहर माने (वय २१, रा. भगवा चौक, कोंढवा), अविनाश मारुती दीक्षित (वय २१, रा. भोलेनाथ चौक, कोंढवा), आशिष अरविंद पासकंडी (वय २१, रा. भोलेनाथ चौक, कोंढवा) अशी या गुंडांची नावे आहेत. हे सर्व जण भाड्याने राहतात.

मयूर गायकवाड हे घरी जात असताना एकाने हातातील कमरेच्या पट्ट्याने त्यांच्या मानेवर मारहाण केली. त्यांचा मित्र आयान याच्या छातीवर मारहाण करून दुखापत केली. महामुनी यांच्या दुचाकीचे नुकसान केले. दगडफेक करून दहशत माजवून ते पळून गेले होते.

येवलेवाडी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या गुंडांची नावे निष्पन्न केली. त्यातील ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व गुंडांची येवलेवाडी पोलिसांनी ज्या परिसरात त्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला, त्याच परिसरात धिंड काढून गुन्हेगारांना इशारा दिला.

get_footer();