आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

adminuser • Political • March 19, 2026

पुणे : मद्यपीच्या डोक्याला लागलेल्या जखमेवर डॉक्टरांनी मलमपट्टी केली. पैशांवरून वाद घालून मद्यपीने डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच क्लिनिकमध्ये तोडफोड केली. यावेळी काच लागून क्लिनिकमधील रुग्ण जखमी झाला. लोणी काळभोर पोलिसांनी या मद्यपीवर गुन्हा दाखल केला आहे.

संतोष रमेश गुंजाळ (वय ३५, रा. काकडे वस्ती, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्या मद्यपीचे नाव आहे. याबाबत डॉ. संतोष महादेव गायकवाड (वय ३७, रा. कुशल वाटिका, लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना थेऊर येथील श्रेया क्लिनिकमध्ये १८ मार्च रोजी दुपारी पावणे एक वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. गायकवाड हे पेशंट तपासत असताना संतोष गुंजाळ हा दारू पिऊन अचानक क्लिनिकच्या तपासणी कक्षात आला. त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्या जखमेवर डॉक्टरांनी मलमपट्टी करून प्रथमोपचार केले.

त्याचे २२० रुपये डॉक्टरांनी त्याच्याकडे मागितले. तेव्हा संतोष गुंजाळ याने पैसे देण्यास नकार देत डॉक्टरांना शिवीगाळ केली. क्लिनिकमध्ये गोंधळ घातला. दगड फेकून क्लिनिकचा काचेचा दरवाजा व पार्टिशन फोडून नुकसान केले.

संतोष गुंजाळ याने डॉक्टरांच्या पाठीच्या डाव्या बाजूस, खालच्या बरगडीजवळ आणि डाव्या हाताच्या पंजावर दगड मारल्याने मार लागून जखम झाली. तसेच त्याने दगड फेकून क्लिनिकचा काचेचा दरवाजा फोडला. या दरवाजाची काच उडून रुग्ण हनुमंत बळे यांना लागून त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला जखम झाली. सहायक पोलीस निरीक्षक अरुण जाधव तपास करीत आहेत.

get_footer();