आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खून करण्यासाठी येणाऱ्या चौघांना पोलिसांनी पकडले

adminuser • Political • March 18, 2026

पुणे : किरकोळ कारणावरून डोक्यात दगड मारून जखमी केल्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी मांढरदेवी यात्रेतून कोयते खरेदी करून कट रचून खून करण्यासाठी येणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने पकडले. त्यामुळे संभाव्य खुनाची घटना टाळण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत पोलीस अंमलदार शेखर बाळासाहेब काटे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना हडपसरमधील लक्ष्मीमाता मंदिराजवळ नाल्यालगत १७ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री सव्वा वाजता घडली. ही सर्व मुले १७ वर्षांची असून थेऊर येथे राहणारी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदोबस्ताच्या अनुषंगाने १७ मार्च रोजी गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस हवालदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, पोलीस अंमलदार शेखर काटे, गणेश माने हे पेट्रोलिंग करत हडपसरमधील लक्ष्मीमाता मंदिराजवळ आले.

पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवर चौघेजण संशयास्पद रित्या येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केल्यावर ते गाडी वळवून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांना जागीच पकडले.

चौघांना गाडीवरून खाली उतरवून त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांच्यातील एक जण कमरेला हात लावून काहीतरी लपवत असल्याचे लक्षात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला कोयता आढळला. चौघांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे ३ कोयते व एक गिलवर मिळून आली. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर खुनाचा कट उघडकीस आला.

पोलिसांनी त्यांच्याकडील ३ कोयते व गिलवर जप्त केली असून हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पेट्रोलिंगदरम्यान अल्पवयीन मुलांना वेळीच पकडल्याने होऊ घातलेला खुनाचा गुन्हा टळला. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.

get_footer();