एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा
मध्य प्रदेशातील खाणीमध्ये एका महिन्यात २६७ बोगस कामगार दाखवून फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मध्य प्रदेशातील खाणीमध्ये काम करणाऱ्या सुमारे ९०० कामगारांच्या वेतनपत्रकात जानेवारी २०२६ महिन्यात २६७ बोगस कामगार दाखवून कंपनीची सुमारे १ कोटी २ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंपनीच्या मानव संसाधन व्यवस्थापकाविरुद्ध (एचआर मॅनेजर) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कंपनीच्या वतीने सुनिल आनंदराव यादव (वय ६१, रा. स्कायवन, मॉडेल कॉलनी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शैलेंद्रसिंग राठोड (रा. चतु:श्रृंगी मंदिराजवळ, पुणे; मूळ रा. छावणी शिकार, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार १० फेब्रुवारी २०२६ रोजी मॉडेल कॉलनी येथील कंपनीच्या कार्यालयात उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएलएफ प्रोजेक्ट या कंपनीची मध्य प्रदेशात खाण आहे. खाणीतून विविध खनिजे बाहेर काढण्यापूर्वी त्यावरील माती काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर कामगारांकडून करून घेतले जाते. शैलेंद्रसिंग राठोड हा कंपनीत मानव संसाधन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता आणि कामगारांच्या वेतन वितरणाची जबाबदारी त्याच्याकडे होती.
जानेवारी २०२६ महिन्यात राठोडने कंपनीच्या वेतनपत्रकात ९०० कामगारांच्या खात्यावर वेतन पाठविल्याची नोंद केली. मात्र कंपनीने अंतर्गत तपासणी केल्यानंतर या ९०० कामगारांपैकी २६७ कामगार हे प्रत्यक्षात कंपनीचे कर्मचारी नसल्याचे समोर आले.
राठोडने या बनावट कामगारांची नावे व बँक खाती वेतनपत्रकात समाविष्ट करून कंपनीच्या खात्यातून सुमारे १ कोटी २ लाख रुपये त्यांच्या खात्यावर कंपनीची परवानगी न घेता वर्ग केले. त्यामुळे कंपनीची मोठी आर्थिक फसवणूक झाली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील करत आहेत.
