आवृत्ती पुणे
← Back to Homepage

माहिती आणि तंत्रज्ञान हा आधुनिक व्यापाराचा पाया – नितीन गडकरी

adminuser • Political • March 7, 2026

पुणे : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसायाचे आयाम बदलत असून व्यापाऱ्यांनी काळाची पावले ओळखून व्यापार पद्धत्तीत आवश्यक बदल घडवून आणल्यास व्यापारात अधिक वृद्धी होईल, असा विश्वास केंद्रिय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला.

दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कारां’चे वितरण केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर सहकार आणि नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूरे, दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड आणि माजी अध्यक्ष रायकुमार नहार, प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते.

यावेळी यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार नागपूरचे पगारिया ग्रुपचे चेयरमेन उज्वल पगारीया यांना, जिल्हास्तरीय पुरस्कार चितळे उद्योग समुह, पुणेचे संजय उर्फे गोविंद चितळे यांना, पुणे शहरस्तरीय पुरस्कार रेनबो हाऊसिंग, पुणेचे सुनील नहार यांना, दि पूना मर्चंटस् चेंबर सभासद पुरस्कार मे. नवीन पेढी, पुणेचे जयभगवान गोयल यांना, दि पूना मर्चंटस् चेंबरचे युवा सभासद पुरस्कार मे. विरल इंटरनॅशनल, पुणेचे विरल पटेल यांना तर दै. लोकसत्ताचे राहुल खळदकर यांना कै.वि.ल.गवाडीया आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, कोणताही व्यवसाय एका रात्रीतून उभा रहात नसतो. त्याच्यामागे अनेक पिढ्यांचे योगदान आणि त्याग तसेच समर्पण असते. यश-अपयश, मान, सन्मान, अपमान यांच्या हिंदोळ्यावर व्यापारी प्रवास करीत असतो.

भूतकाळातील यश-अपयशांच्या कटू आणि चांगल्या आठवणींच्या जोरावर तो यशस्वी भविष्याकडे वाटचाल करीत असतो. पिढीजात व्यवसाय असल्याने तुम्ही व्यापारी होऊ शकतात, असे नाही. कारण व्यापारी ही मूळ वृत्ती आहे. ही वृत्ती तुमच्या अंगी भिनल्यावरच तुम्ही व्यापाराचा विस्तार करू शकतात.

कोणताही व्यावसायिक सचोटी, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या मूल्यांची कास धरूनच वाटचाल करीत असतो. योग्यवेळी योग्य निर्णय घेणे आणि धाडसाने तो निभावून नेणे हे व्यावसायिकाची गुणवैशिष्ट्ये आहेत. व्यवसायातून केवळ संपत्ती निर्माण होत नाही, तर रोजगाराची देखील निर्मिती होत असते. रोजगार निर्मितीमुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळत असल्याने गरिबी देखील दूर होते.

पुणे शहरात प्रचंड क्षमता असून त्या क्षमतांना अधिक चालना देण्यासाठी पुण्याच्या भोवती रिंगरोडचे जाळे निर्माण केले जात आहे. या रिंगरोडच्या माध्यमातून पुणे शहरात मोठी गुंतवणूक येऊन पर्यावरणाचे संतुलन राखत शाश्वत विकासाच्या दृष्टीने पुणे वाटचाल करेल.

यावेळी मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे यांनी मनोगत व्यक्त केले. दि पूना मर्चंटस् चेंबरचे सचिव ईश्वर नहार यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केले, तर रत्ना दहिवलकर यांनी सूत्रसंचालन केले. दि पूना मर्चंटस् चेंबरचे सहसचिव आशिष दुगड यांनी आभार मानले.

get_footer();