आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पीएमपीचे बनावट मोबाईल अ‍ॅप्लीकेशनने केली फसवणूक

adminuser • Political • February 27, 2026

पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करण्यासाठी किती पैसे लागतात? अगदी दिवसभराचा पास ७० रुपयांना मिळतो. असे असताना पीएमपीच्या मूळ अ‍ॅप्लिकेशनसारखेच दिसणारे बनावट मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करून त्यावर खोटा दैनंदिन पास तयार केला आणि त्याचा वापर करून पीएमपीची फसवणूक करणाऱ्या एका तरुणावर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कौस्तुभ शैलेश मांजरेकर (वय २४, रा. प्रितम हाइट्स, बालाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीएमपीएमएलतर्फे मिठ्ठु साहेबराव बडे (वय ४५, रा. शेवाळेवाडी फाटा, मांजरी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना भारती विद्यापीठ बीआरटी बस स्टॉपवर २६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कौस्तुभ मांजरेकर हा नोकरी करतो. तो भारती विद्यापीठ बीआरटी बस स्टॉप येथून पीएमपी बसमधून प्रवास करत होता.

त्यावेळी त्याने मिठ्ठु बडे यांना आपल्या मोबाईलवरील दैनंदिन पास दाखविला. तो पास पाहून त्यांना शंका आली. त्यांनी त्याची खात्री करण्यासाठी पीएमपी कार्यालयाशी संपर्क साधून तपासणी केली. त्यात तो पास बनावट असल्याचे आढळून आले.

कौस्तुभ मांजरेकर याने स्वतःच्या व इतरांच्या आर्थिक फायद्यासाठी पीएमपीच्या मूळ अ‍ॅप्लिकेशनसारखे दिसणारे बनावट मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले. त्यात ७० रुपयांचा खोटा दैनंदिन पास तयार करून त्याचा वापर करून तो अधिकृत पासधारक असल्याचे भासवत होता.

या पासच्या माध्यमातून तो पुणे शहरात प्रवास करून पीएमपीची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करत होता. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे करीत आहेत.

get_footer();