आवृत्ती पुणे
← Back to Homepage

एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

adminuser • Political • February 26, 2026

पुणे : एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची मदतीचा बहाणा करून ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना बाणेर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पाषाण–सूस रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. गेल्या महिन्यात ते एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी एटीएमच्या परिसरात एक अज्ञात व्यक्ती थांबलेली होती.

ज्येष्ठ नागरिक एटीएममध्ये गेल्यानंतर ती व्यक्तीही त्यांच्या मागोमाग आत गेली. त्याने मदत करण्याचा बहाणा करत कार्ड मशीनमध्ये टाकण्यास आणि व्यवहार पूर्ण करण्यास मदत करण्याचे नाटक केले. हातचलाखी करून त्याने ज्येष्ठ नागरिकांचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवले आणि दुसरे कार्ड त्यांना परत दिले.

एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे भासवून त्याने ज्येष्ठ नागरिकांना दिशाभूल केली. त्यानंतर आरोपीने ज्येष्ठ नागरिकांच्या खात्याचा पासवर्ड वापरून त्यांच्या बँक खात्यातून ८० हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सानप करीत आहेत.

get_footer();