आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

adminuser • Political • February 18, 2026

बुधवार पेठेत पोलिसांनी नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईत दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले होते. तसेच चार अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली होती. पोलिसांनी या कारवाईत अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला अटक केली होती. त्याच्याकडून चरस तसेच इंजेक्शने जप्त करण्यात आली होती.

बुधवार पेठेत बांगलादेशी तरुणी बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फरासखाना आणि खडक पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी या भागातील कुंटणखान्यांची तपासणी केली. संशयावरून २२ तरुणींना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी ११ तरुणींनी ओळखपत्र तसेच नागरिकत्वाची कागदपत्रे सादर केली.

उर्वरित ११ तरुणींची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी बांगलादेशी असल्याची माहिती दिली. कागदपत्रांच्या तपासणीत त्या बांगलादेशी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फरासखाना पोलीस ठाण्याला भेट दिली.

बांगलादेशी तरुणी बुधवार पेठेत कशा आल्या, तसेच त्यांना दलालाने पुण्यात कसे आणले, याचा तपास सुरू आहे. आठवडाभरापूर्वी पोलिसांनी बुधवार पेठेत झाडाझडती घेतली होती. या कारवाईत जवळपास ७०० जणांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी (१८ फेब्रुवारी) पुन्हा कारवाई करण्यात आली.

कुंटणखाने करणार सील
ज्या कुंटणखान्यांमध्ये बांगलादेशी तरुणी आढळल्या, ते कुंटणखाने सील करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. यापुढे बुधवार पेठेत नियमित कारवाई करण्यात येणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे

get_footer();