आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हुंडासाठी छळातून नवविवाहितेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

adminuser • Political • February 27, 2026

पुणे : हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वैष्णवी हगवणे हिच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्याचीच पुनरावृत्ती बाणेरमध्ये घडली आहे. परदेशात उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर जावई मिळत असल्याचे वाटल्याने कलबुर्गी येथील एका प्राध्यापकाने आपली जमीन विकून मुलीचे थाटामाटात लग्न लावून दिले. मात्र हुंड्याच्या हव्यासापायी छळ होत असल्याने लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

गंगा तेजस बेंबळकर (वय २७, रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) असे मृत्यू पावलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचे वडील शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (वय ५९, रा. कर्नाटक हौसिंग बोर्ड, अक्का महादेवी कॉलनी, कलबुर्गी, कर्नाटक) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी तेजस शिवा बेंबळकर (वय ३१), उज्ज्वला शिवा बेंबळकर (वय ५८), शिवा माणिकराव बेंबळकर (वय ६२) आणि रिया शिवा बेंबळकर (वय ३३, सर्व रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कलबुर्गी येथील महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांची मुलगी गंगा हिच्यासाठी तेजस बेंबळकर याचे स्थळ सुचविण्यात आले. ते मूळचे परभणीचे रहिवासी आहेत.

तेजस याने इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेतले असून तो पुण्यात आयटी इंजिनिअर म्हणून एका कंपनीत काम करतो. १७ मे २०२५ रोजी कलबुर्गी येथे गंगा हिच्या पाहणीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी शिवा बेंबळकर व तेजस बेंबळकर यांनी गंगा सुंदर तसेच उच्चशिक्षित असून आमच्या अपेक्षेप्रमाणे आहे, तुम्ही फक्त कन्यादान करा, लग्नात आम्हाला काहीही नको, असे सांगून साखरपुड्याची तारीख ठरवली.

१५ जून २०२५ रोजी वाकड येथील इसेन्सिया प्रिमियर हॉलमध्ये गंगा व तेजस यांचा साखरपुडा झाला. प्राध्यापकांनी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार २० आहेर नेले होते. त्यात कपडे, चांदीचे ताट व चांदीचा नंदी यांचा समावेश होता.

हा आहेर पाहून तेजसची आई उज्ज्वला बेंबळकर म्हणाली की, पाहुण्यांमध्ये आमची इज्जत काढण्यासाठी असा भिकारी व फालतू आहेर आणला आहे का? आम्ही तुम्हाला भिकारी दिसतो का? आमचे कुटुंब प्रतिष्ठित असून आमचे पाहुणे उच्चवर्गीय आहेत, असे म्हणत त्यांनी सर्वांसमोर प्राध्यापक कुटुंबाचा अपमान केला.

तेजसचे वडील लग्नामध्ये आम्हाला तुमच्याकडून काहीही नको, फक्त कन्यादान करा, असे म्हणाले होते. मात्र त्यानंतर त्यांनी त्यांच्या घराण्याची प्रतिष्ठा सांगत लग्नासाठी चांगले हॉटेल व मंगल कार्यालय हवे, अशी मागणी केली.

कलबुर्गी येथे येऊन त्यांनी महागडे मंगल कार्यालय व हॉटेल पाहिले; अन्यथा आम्ही लग्नासाठी येणार नाही, असेही सांगितले. त्यामुळे प्राध्यापकांच्या मनाला मोठा धक्का बसला. मात्र मुलगी गंगा हिच्या सुखासाठी त्यांनी आपला प्लॉट विकून १ लाख ८० हजार रुपये भरून मंगल कार्यालय बुक केले.

१३ नोव्हेंबर २०२५ रोजी विवाह ठरला. लग्नासाठी बेंबळकर कुटुंबातील १६० पाहुणे आले होते. मंगल कार्यालयात आल्यानंतर त्यांना ते ठिकाण पसंत पडले नाही. त्यांनी पुन्हा घालून-पाडून बोलणे सुरू केले.

या ठिकाणी पाहुण्यांसाठी देशी-विदेशी दारू किंवा वाईनची सोय नाही, अशा फालतू ठिकाणी आम्ही राहू शकत नाही, असे म्हणत त्यांनी अपमान केला. त्यामुळे त्यांची वेगवेगळ्या हॉटेल व अपार्टमेंटमध्ये व्यवस्था करण्यात आली.

नवरदेवाला चांगल्या कंपनीची अंडरवेअर व बनियन आणली नाही, या कारणावरून तो लग्नाच्या मुहूर्तावरही आला नव्हता. लग्नानंतर आठवड्याभराने धार्मिक विधीसाठी मुलगी व जावई कलबुर्गी येथे आले. तेव्हा गंगा हिने तिला घालून-पाडून बोलतात, तुझ्या आई-वडिलांनी लग्नात आमच्या मनासारखा हुंडा दिला नाही तसेच आमच्या मनाप्रमाणे लग्न केले नाही.

आता माहेरून २१ तोळे सोने घेऊन ये, अशी मागणी केली जात असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी मुलीची समजूत काढून तिला परत सासरी पाठविले. नंतर सोलापूर येथे एका लग्नासाठी ५ फेब्रुवारी रोजी गंगा तिच्या वडिलांना भेटली.

तेव्हा तिने आपल्याला हुंड्यावरून त्रास दिला जात असल्याचे सांगितले. त्यांनी पुढील महिन्यात पुण्यात येऊन भेटू, असे सांगितले. मात्र ही भेट होण्याआधीच १९ फेब्रुवारी रोजी रात्री गंगाने राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

गंगा हिच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर करीत आहेत.

get_footer();