आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शोरुममधील एक्सॉसमधून शिरून रोकड केली लंपास

adminuser • Political • February 9, 2026

पुणे : शोरुममधील एक्सॉससाठी लावलेली जाळी तोडून आत प्रवेश करून काऊंटरच्या ड्रॉव्हरमधील २ लाख ७० हजार रुपये चोरून नेणाऱ्या कामगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली आहे.

बापूराव संदीपान गायकवाड (वय २५, रा. कैलासनगर, वडकी नाला, ता. हवेली, मुळ रा. निळज, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत संतोष प्रल्हाद कामठे (वय ४६, रा. यश बंगलो, कामठे आळी, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार मांजरी रोडवरील कामठे बाईक्समध्ये ६ व ७ फेब्रुवारी दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कामठे यांचे कामठे बाईक्स हे दुचाकीचे शोरुम आहे. त्यांनी कामगारांचा पगार देण्यासाठी २ लाख ७० हजार रुपये काऊंटरच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवले होते.

त्यांच्याकडे बापूराव गायकवाड हा कामगार कामाला होता. शोरुम बंद असताना एक्सॉससाठी लावलेली जाळी तोडून चोरट्याने आत प्रवेश करून काऊंटरच्या ड्रॉव्हरमधील रोकड चोरून नेली होती. कामठे यांच्याकडे काम करणाऱ्या बापूराव गायकवाड यानेच ही चोरी केल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर आणि अमित कांबळे यांना त्यांच्या बातमीदारांकडून मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने त्याचा शोध घेऊन गायकवाड याला पकडले. त्याच्याकडून चोरलेल्या रक्कमेपैकी २ लाख ५९ हजार ८०० रुपये, गुन्हा करून पळून जाण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ३ लाख १७ हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस हवालदार प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, नानासाहेब मोरे, प्रमोद टिळेकर, पोलीस अंमलदार अमित कांबळे आणि नासिर देशमुख यांनी केली आहे.

get_footer();