आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शेअर मार्केट गुंतवणुकीत ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींची फसवणुक

adminuser • Political • February 14, 2026

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची तब्बल २२ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांपैकी पैसे स्वीकारणाऱ्या ८ जणांना छत्रपती संभाजीनगर तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातून अटक करण्यात आली आहे.

मुनीलकुमार सुरेंद्र सिंह (वय ५१, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), आकाश चंद्रशेखर मराठे, लाला केशव उमाप (वय २६), परमेश्वर दिलीप दाभाडे (वय २३, तिघे रा. छत्रपती संभाजीनगर), साहिल जॉन श्रीसुंदर (वय २२, रा. भीमनगर, संभाजीनगर), विश्वजीत जनार्दन खंदारे (वय २१, रा. भीमनगर, संभाजीनगर), अभिजित शशिल नाडे (वय २१, रा. संभाजीनगर), दिशांत राजेंद्र कांबळे (वय २२, रा. भीमनगर, संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुण्यातील ८५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनी सायबर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी फिर्याद दिली होती. हे ज्येष्ठ नागरिक मूळचे हरियाणा येथील आहेत. पुण्यात त्यांची खासगी कंपनी होती. कंपनी विक्रीतून त्यांना रक्कम मिळाली होती.

ही रक्कम त्यांनी बँकेत ठेवली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले.

त्यानंतर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजनांची माहिती दिली. चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवली. त्यानंतर त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यांनी सायबर चोरटे वापरत असलेल्या ७ बँक खात्यांमध्ये वेळोवेळी २२ कोटी ३ लाख रुपये जमा केले. मात्र त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही.

या गुन्ह्याचा तपास केला असता मिळालेल्या माहितीच्या तांत्रिक विश्लेषणातून दिसून आले की, फिर्यादी यांची फसवणूक केलेल्या रक्कमेपैकी मोठ्या प्रमाणातील रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली होती. ही रक्कम २७ वेगवेगळ्या लोकांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली होती. त्यातून पोलिसांनी प्रथम चौघांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून साहिल जॉन श्रीसुंदर व इतरांची लिंक लागली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल अडसुळे, सुशील डमरे, पोलीस हवालदार रामाणे, हंबीर, मदने, चौकटे, मांढरे, मुंढे, कोंडे, कारकुड, गंगाधर काळे, पोलीस अंमलदार भिंगारे, होळकर, सचिन शिंदे, विजय भोसले, अमदनान शेख यांनी केली.

get_footer();