आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून ४ दिवसांत १ कोटींची दंडवसुली

adminuser • Political • February 14, 2026

पुणे : शहर पोलीस दलातील वाहतूक पोलीस शाखेचे ३० विभाग आणि ४४ पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत ट्रिपल सीट व इतर वाहतूक नियमभंगाच्या गुन्ह्यांमध्ये ४ दिवसांत पोलिसांनी पुणेकरांकडून तब्बल १ कोटी ३ लाख २५ हजार १५० रुपयांची दंडवसुली केली आहे. इतक्या कमी दिवसांत इतका मोठा दंड पुणेकरांकडून वसूल करण्याचा पुणे पोलिसांनी नवा विक्रम केला आहे.

चौकाचौकात होत असलेल्या दंडवसुलीमुळे वाहतुकीला अडथळा येत असल्याची तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकातील ही वसुली बंद करून फक्त सीसीटीव्हीद्वारे वाहनचालकांवर हेल्मेटसंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर चौकाचौकात होणारी कारवाई थांबली होती. विशेष मोहिमेच्या आधारे आता पुन्हा एकदा चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू झाली आहे. वाहतूक पोलीस शाखेचे ३० विभाग आणि ४४ पोलीस ठाणी यांनी गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहीम सुरू केली आहे.

यामध्ये १२ व १३ फेब्रुवारी रोजी शहरात ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या २ हजार ६४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान ९८८ वाहने जप्त करण्यात आली. २ हजार १३७ चलने पेड करून घेण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येकी १ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.

त्यामधून २१ लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय एकूण १३ हजार ३०८ चलनांवर कारवाई करण्यात आली आहे. १० फेब्रुवारीपासून आतापर्यंत एकूण ५ हजार ३८० ट्रिपल सीट वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. ट्रिपल सीट व इतर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून १ कोटी ३ लाख २५ हजार १५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

get_footer();