आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

adminuser • Political • March 19, 2026

पुणे : येरवडा येथील चिमा घाट येथे कोणाची तरी वाट पाहत थांबलेल्या तरुणाला पकडून लक्ष्मीनगर पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले आहे.

विनयसिंग विनोदसिंग बावरी (वय १९, रा. पोते वस्ती, मांगीरबाबा मंदिराशेजारी, येरवडा) असे त्याचे नाव आहे. विनयसिंग बावरी हा फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करतो. यापूर्वी कर्जाचे हप्ते थकल्याने मारहाण करून मोटारसायकल जबरदस्तीने ओढून नेल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राहुल परदेशी व अक्षय शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येरवडा येथील चिमा घाट येथे एक जण थांबला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे. या माहितीची खातरजमा करून सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार यांनी आपल्या पथकासह चिमा घाट येथे जाऊन पाहणी केली. तेव्हा विनयसिंग बावरी येथे थांबलेला दिसून आला.

पोलिसांनी त्याला हटकल्यावर तो कावरा-बावरा होऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला जागेवरच पकडले. बावरी याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळाले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त चुलूमूला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जैतापूरकर, सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार अमोल गायकवाड, कादिर शेख, अतुल जाधव, सूरज ओंबासे, राहुल परदेशी, अक्षय शिंदे, कांबळे, दत्तात्रय शिंदे यांनी केली आहे.

get_footer();