आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रेकॉर्डवरील दोघा अल्पवयीन मुलांकडून २ पिस्टल, ४ काडतुसे जप्त

adminuser • Political • February 16, 2026

पुणे : तीन महिन्यांपूर्वी एकाचा खुन केल्याने त्याचे साथीदार बदला घेतील, या भितीने अल्पवयीन मुलाने व त्याच्या रेकॉर्डवरील अल्पवयीन मित्रांनी पिस्टल बाळगले होते. सिंहगड रोड पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्याचे सहकारी गुन्हे प्रतिबंधात्कक पेट्रोलिंग १४ फेबुवारी रोजी करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार विनायक मोहिते व सागर शेडगे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, विठ्ठलवाडी मंदिरासमोर नदीपात्रामध्ये स्मशानभूमी समोर दोघे जण अंधारात थांबले असून त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहेत.

बातमीची खात्री करुन पोलीस पथक मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी गेले. तेव्हा दोघे मुले थांबलेली आढळून आली. त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतल्यावर त्या दोघांजवळ एक एक पिस्टल मिळाले.
पिस्टलाची पाहणी केल्यावर त्यामध्ये दोन दोन जिवंत काडतुसे आढळून आली. ८४ हजार रुपयांचे दोन पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारु, अण्णा केकाण, विकास बांदल, राहुल ओलेकर, सागर शेडगे, समीर माळवदकर, सतीश मोरे, विनायक मोहिते, शिरीष गावडे यांनी केली आहे.

दोघेही सराईत गुन्हेगार
पिस्टल बाळगणारे दोघेही अल्पवयीन मुले सराईत गुन्हेगार आहेत. दोघे एकमेकांचे मित्र आहेत. एका अल्पवयीन मुलावर तीन महिन्यांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ज्याचा खुन केला, त्याचे साथीदार आपल्याला मारतील, या भितीने तो पिस्टल बाळगून होता. त्याचा मित्रही अल्पवयीन असून त्याच्यावर पिस्टल बाळगल्याप्रकरणी पिपंरीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी येरवडा येथील पंडीत जवाहरलाल नेहरु बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.

get_footer();