येरवडा कारागृहात ५ मोबाईल, २ पॉवर बँक, चार्जिंग वायर सापडले
कारागृहाने १, २ व ६ बराकाची विशेष झडती मोहिम घेतल्याने झाला प्रकार उघड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : येरवडा कारागृह येथे सीमा भिंतीलगत असलेल्या बाह्य शौचालयाजवळ मोबाईल फोन आढळल्यानंतर कारागृह प्रशासनाने १, २ आणि ६ क्रमांकाच्या बराकींमध्ये विशेष झडती मोहिम राबवली. या कारवाईत एकूण ५ मोबाईल फोन, २ पॉवर बँक आणि चार्जिंग वायर जप्त करण्यात आल्या. त्यामुळे कारागृहात बेकायदेशीररीत्या मोबाईलचा वापर होत असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी सहायक तुरुंगाधिकारी सुनिल तुकाराम गायकवाड (वय ५५) यांनी येरवडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार कैदी नौशाद बदुद्रीन शेख आणि इतर कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आणि २२ फेब्रुवारी रोजी दुपारी चार ते साडेआठ या वेळेत उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संचारफेरीदरम्यान सहायक तुरुंगाधिकारी सर्कलच्या आवारात गस्त घालत होते. त्यावेळी बाह्य शौचालयाच्या मागील बाजूस एक बंदी संशयास्पद हालचाल करताना दिसला.
अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता, नौशाद शेख याने जमिनीवर पडलेला मोबाईल त्यांच्या ताब्यात दिला. मात्र चौकशीत त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार कारागृह उपमहानिरीक्षक यांची परवानगी घेऊन २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार ते साडेसहा या वेळेत विशेष झडती मोहिम राबवण्यात आली.
बराक क्रमांक १ मधील शिक्षा भोगत असलेल्या नौशाद शेखच्या बॅगेची झडती घेतली असता ‘हिरो’ कंपनीचा बॅटरी व सिमकार्ड नसलेला मोबाईल आणि चार्जिंग वायर आढळली. तसेच बराक क्रमांक १ च्या बाहेरील परिसरातून ‘नोकीया’ कंपनीचे बॅटरी व सिमकार्डविना तीन मोबाईल जप्त करण्यात आले. बराक क्रमांक ६ च्या बाहेरील बाजूस एक मोबाईल, दोन पॉवर बँक आणि चार्जिंग वायर सापडल्या.
कारागृहात परवानगीशिवाय मोबाईल फोन, पॉवर बँक व इतर साहित्य बाळगल्याप्रकरणी नौशाद शेख व इतर कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे पुढील तपास करत आहेत.
