आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

adminuser • Political • April 20, 2026

पुणे : किरकोळ कारणावरून आत्याच्या मुलाने मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक व लाकडी बॅटने मारहाण करून त्याचा खून केला. मार्केटयार्ड पोलिसांनी आत्याच्या मुलाला अटक केली आहे.

रोहन कांतीलाल ओव्हाळ (वय २८, रा. काकडे वस्ती, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कौशल लांडगे (वय २०, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या साथीदारावरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील अश्विनी पॅराडाईस सोसायटीजवळ सोमवारी पहाटे सुमारे पावणे पाच वाजता घडली. याबाबत रोहन ओव्हाळ यांच्या बहिणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन ओव्हाळ हा कोणताही व्यवसाय करत नव्हता.

तो युट्युबवर रील्स बनवत असे. कौशल लांडगे हा त्याचा आत्येभाऊ आहे. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी कौशल व अंश पटेल यांनी पेव्हर ब्लॉक व लाकडी बॅटने रोहनच्या डोक्यात मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.

जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. मार्केटयार्ड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून कौशल लांडगे याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप तपास करत आहेत.

get_footer();