आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बुलेट चालकाने ज्येष्ठ नागरिकास केली मारहाण

adminuser • Political • February 20, 2026

पुणे : सोसायटीच्या आवारात बुलेटचा कर्णकर्कश हॉर्न वाजवल्याबाबत विचारणा केल्याने ज्येष्ठ नागरिकाला बॅट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना महर्षीनगर भागात घडली. या प्रकरणी बुलेट चालकासह त्याच्या ७ ते ८ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महर्षीनगरमध्ये राहणाऱ्या ५९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना महर्षीनगरमधील न्यू कॉमनवेल्थ सोसायटी इमारतीत १७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक महर्षीनगर भागातील एका सोसायटीत राहतात. आरोपी बुलेट चालक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सोसायटीच्या आवारात आला. त्याने जोरात बुलेटचा हॉर्न वाजवला.

बुलेटच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे त्रस्त झालेल्या ज्येष्ठांनी त्याला याबाबत विचारणा केली. त्यावर बुलेट चालकाने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर तो ७ ते ८ साथीदारांना घेऊन पुन्हा सोसायटीच्या आवारात आला. “हाच तो मला बोलणारा,” असे म्हणत त्याने ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व बॅटने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

दरम्यान, बुलेटमध्ये बसविण्यात आलेल्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या १५० बुलेट चालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या बुलेटचे सायलेन्सर काढून ते रोडरोलरने नष्ट करण्यात आले.

बेशिस्त दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत विरुद्ध दिशेने जाणारे तसेच ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करून दुचाकी जप्त करण्यात आल्या.

get_footer();