आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून २ कोटींची फसवणूक

adminuser • Political • March 21, 2026

पुणे : पेट्रोलपंप व्यवसायापेक्षा बाटलीबंद पाणी व्यवसायात अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून एका पेट्रोलपंप व्यावसायिकाची २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत आनंद मदनलाल लाहोटी (रा. रुन्बाल सिग्नल सोसायटी, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रतीक काबरा, रोहित राजेश काबरा आणि राजेश सत्यनारायण काबरा (सर्व रा. युनिका हौसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना कदमवाक वस्ती येथील ए. पी. बेव्हरेजेस या कंपनीत डिसेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ‘मगर फ्युल स्टेशन’ या नावाने पेट्रोल-डिझेल पंप असून उंड्री येथे ‘महाराष्ट्र स्कॉश अॅकॅडमी’ आहे.

आरोपी प्रतीक काबरा याचा ‘द रुबाबदार परफेक्ट मेन्स स्टोअर’ या नावाने कपड्यांचा व्यवसाय आहे. तसेच ‘ते ९ पीएम’ या नावाने २०० मिली, ५०० मिली व १ लिटर पाण्याच्या बाटल्यांची विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाण्याच्या व्यवसायात ४० ते ५० टक्के नफा असल्याचे सांगून त्यांनी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादी यांनी बॉटल पॅकेजिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रतीक काबरा याला ३ लाख रुपये दिले.

त्याचा भाऊ रोहित ट्रान्सपोर्टेशनचे काम पाहत होता, तर वडील राजेश प्लांटचे व्यवस्थापन व देखभाल करत होते. दोन महिन्यांनंतर स्वतःचा प्लांट सुरू करण्याचा प्रस्ताव देत त्यांनी फिर्यादींकडून निधी उभारण्यास सांगितले. त्यानुसार १७ फेब्रुवारी २०२५ रोजी भागीदारी करार करण्यात आला.

या करारानुसार फिर्यादी व प्रतीक काबरा हे ५०-५० टक्के भागीदार होते, तर राजेश व रोहित काबरा यांना प्रत्येकी ५० हजार रुपये मासिक वेतन ठरवण्यात आले. गुंतवणुकीच्या आमिषाने आरोपींनी फिर्यादींकडून १ कोटी ७८ लाख ७५ हजार रुपये घेतले.

तसेच कच्चा माल व इतर खर्चांसाठी एकूण २ कोटी ३४ लाख २३ हजार रुपये गुंतवले गेले. याशिवाय, रोहित काबरा यांच्या नावावरील टोयोटा फॉर्च्युनर गाडीवरील कर्ज फेडण्यासाठी बजाज फायनान्सकडून ३४ लाखांचे कर्ज घेण्यात आले, त्यातील १२ लाख रुपये प्लांटमध्ये गुंतवण्यात आले.

या गाडीचा ७८ हजार रुपयांचा मासिक हप्ता फिर्यादी भरत आहेत. जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बाटलीबंद पाण्याच्या विक्रीतून ६० लाख ६७ हजार १९२ रुपयांचा व्यवसाय झाला. त्यापैकी केवळ ५ लाख १९ हजार २५६ रुपये फिर्यादींना देण्यात आले, तर उर्वरित ५५ लाख ४८ हजार ९३६ रुपये आरोपींनी स्वतःच्या खात्यात जमा केले.

याबाबत विचारणा केल्यावर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्यांनी भागीदारी तोडण्यास सांगून गुंतवणूक परत न करता, फिर्यादींच्या पैशातून खरेदी केलेली यंत्रसामुग्री परस्पर विक्री केली. अशाप्रकारे २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर करत आहेत.

get_footer();