आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलीस असल्याची बतावणी करून ३१ लाखांची फसवणूक

adminuser • Political • February 25, 2026

पुणे : काळ्या पैशांच्या व्यवहारात बेकायदा बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, या प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी लष्कर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची ३१ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

याबाबत ५९ वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लष्कर भागात राहतात.

सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. पोलीस अधिकारी असल्याची बतावणी सायबर चोरट्याने केली. काळ्या पैशांच्या व्यवहारात (मनी लॉन्डरिंग) त्यांच्या बँक खात्याचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात अटक (डिजिटल अरेस्ट) करण्यात येणार असल्याची भीती दाखवण्यात आली.

अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी भीती चोरट्याने त्यांना दाखवली. चौकशीची भीती दाखवून सायबर चोरट्याने त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ३१ लाख ४५ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीपकुमार पवार तपास करत आहेत.

सीबीआय, ईडी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अशा तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी आतापर्यंत नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या अशा बतावणींकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

get_footer();