आवृत्ती पुणे
← Back to Homepage

निलंबित पोलीस हवालदाराला आंध्र प्रदेशातून अटक

adminuser • Political • February 10, 2026

पुणे : पोलीस कर्मचारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सांगून विवाहित महिलांची आणि सराफांची फसवणूक करणाऱ्या निलंबित पोलीस हवालदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली आहे.

गणेश अशोक जगताप (वय ५२, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गणेश जगताप याने राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी आपल्या फाईलमधील शिक्षा झालेली पाने काढून टाकून खोटी कागदपत्रे जोडली होती.

२०११ मध्ये सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी जगतापसह दोन लिपिकांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याने सराफांसह महिलांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले होते.

जगताप याच्यावर भारती विद्यापीठ, चतु:श्रृंगी आणि कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी रविवारी दुपारी त्याला ताब्यात घेतले. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पार्लर व्यवसायिक महिलेची अडीच लाखांहून अधिक रोकड तसेच सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन त्याने फसवणूक केली होती. पत्नीच्या आजारपणाचा बहाणा करून तसेच मुलीच्या शिक्षणाचे कारण सांगून त्याने ही फसवणूक केली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून जगताप याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

याआधीही जगताप याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात एका महिलेचे ७३ तोळे सोने आणि १७ लाख रुपये रोख घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा जुलै महिन्यात दाखल झाला होता. दरम्यान, २१ ऑगस्ट २०२४ रोजी जगताप याची पोलीस मुख्यालयातून विशेष शाखेत बदली करण्यात आली होती.

मात्र, हजर न राहता त्याने यादरम्यान औंध येथील आणखी एका सराफाला गंडा घातला. पुण्यातील औंध भागातील एका सराफी व्यावसायिकाकडून जगताप याने पोलीस दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव वापरून ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले होते. ही घटना समोर आल्यानंतर विशेष शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगताप याला निलंबित केले होते.

get_footer();