दोघा उच्चशिक्षित तरुणांकडून पिस्टल, ४ काडतुसे जप्त
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमधून संरक्षणासाठी बाळगले होते : नर्हे पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती. त्यामुळे अहिल्यानगर व पिंपरी-चिंचवडमधील अनेक जण त्याच्या मागावर होते. त्यातूनच त्याने संरक्षणासाठी पिस्टल बाळगले होते. नर्हे पोलिसांना ही बाब समजताच पोलिसांनी लॉजवर राहणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्याकडून पिस्टल व ४ काडतुसे जप्त केली आहेत.
साहिल सतीश मेहेर (वय ३१, रा. नाना चौक, तपोवन रोड, सावेडी, अहिल्यानगर) आणि शुभम सचिन अजेटराव (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, पोलीस अंमलदार भोरडे, चव्हाण असे अवैध धंद्यावर ६ एप्रिल रोजी कारवाई करत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार निलेश भोरडे व सुनील चव्हाण यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अभिरुची मॉलच्या बाजूला द्वारका लॉजमध्ये उतरलेल्या प्रवाशाकडे पिस्टल आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन पोलीस पथक द्वारका लॉजला गेले.
दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक २०५ ची बेल वाजवली. आतून दरवाजा उघडल्यावर रूममध्ये दोघेजण असल्याचे दिसले. त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता काळ्या बॅगेतील कॅरी बॅगमध्ये एक लोखंडी पिस्टल व ४ जिवंत काडतुसे, तसेच दोन मोबाईल मिळून आले. नर्हे पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, पोलीस अंमलदार प्रणील मेस्त्री, निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे यांनी केली आहे.
शेअर मार्केटचा नाद भोवला – साहिल मेहेर याने एमबीएचे शिक्षण घेतले असून त्याला शेअर मार्केटचा नाद आहे. शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे गुंतवून जादा परतावा मिळवून देतो, असे सांगून त्याने अहिल्यानगरमधील अनेकांची फसवणूक केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. लोकांचा ससेमिरा चुकवण्यासाठी तो अहमदाबादला पळून गेला होता. तेथे तो एका कंपनीत नोकरी करू लागला होता. त्याची माहिती काढत लोक तिकडे संपर्क करू लागले. तेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी त्याने अहमदाबादमधून एक पिस्टल व ४ काडतुसे विकत घेतली होती. त्यानंतर तो पुण्यात मित्राकडे राहिला होता. तेथून ५ दिवसांपूर्वी तो द्वारका लॉजमध्ये राहत होता. शुभम अजेटराव हा त्याचा मित्र असून त्यानेही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.
