आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दुकानात शिरुन तोडफोड करणारे चौघे मुंढवा पोलिसांच्या ताब्यात

adminuser • Political • February 7, 2026

पुणे : घोरपडी येथील बी. टी. कवडे रोडवरील तीन दुकानांमध्ये शिरून तोडफोड करून “कोई बीच में आएगा तो खत्म कर दूंगा” अशी धमकी देत दहशत माजवणाऱ्या ३ अल्पवयीन मुलांसह चौघांना मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राजरत्न कुलदीप खरे (वय २०, रा. एस. आर. ए. बिल्डिंग, भीमनगर, मुंढवा) याला अटक करण्यात आली आहे. दुकानदारांशी कोणताही वाद नसताना केवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने या टोळक्याने तोडफोड करून मोठे नुकसान केले.

याप्रकरणी महावीरसिंग हनुमानसिंग राजपुरोहित (वय ३०, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. राजपुरोहित यांचे बी. टी. कवडे रोडवर ‘कृष्णा मेडिको’ नावाचे मेडिकल दुकान आहे. ३१ जानेवारी रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तिघे जण अचानक दुकानात आले. त्यांनी दुकानाच्या शटरलगत असलेल्या काचेच्या फ्रिजरवर लोखंडी हत्याराने मारून तोडफोड केली.

ते मोठमोठ्याने शिवीगाळ करीत होते. त्यांच्यापैकी डोक्यावर पांढरी टोपी घातलेल्या एका तरुणाने “कोई बीच में आएगा तो खत्म कर दूंगा” अशी धमकी देत शेजारील आराधना स्वीटच्या दिशेने पळ काढला.

यानंतर हे गुंड आराधना स्वीटचे मालक सुरेश चौधरी व ममता सुपर मार्केट या किराणा दुकानाचे मालक रमेशकुमार चौधरी यांच्या दुकानात गेले. त्यांच्या दुकानाच्या शटरलगत असलेली पाणीपुरीची गाडी, कॅश काऊंटरवरील काच तसेच काचेच्या दरवाज्याच्या फ्रिजरची काच फोडून नुकसान करून दहशत माजवून ते पसार झाले.

मुंढवा पोलिसांनी या गुंडांचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार केले. सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजरत्न खरे व त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण पुढील तपास करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, सहायक पोलीस फौजदार राजू कदम, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, योगेश राऊत, अक्षय धुमाळ व स्वप्नील रासकर यांनी केली आहे.

get_footer();