आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चुलत भावाच्या घरी चोरी करणाऱ्यास अटक

adminuser • Political • February 10, 2026

पुणे : घराचे कडी-कुलूप तसेच असताना घरातून २२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. घराची चावी ठेवणाऱ्या दोन-तीन जणांवर संशय होता. मुंढवा पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर चुलत भावानेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. मुंढवा पोलिसांनी २४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला.

आशुतोष अशोक कासवा (वय ३८, रा. गजानन महाराज हौसिंग सोसायटी, राजर्षी शाहू महाराज प्राथमिक विद्यालयाच्या शेजारी, मुंढवा) असे मुंढवा पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत श्रेणिक विनोद कासवा (वय ४०, रा. गजानन महाराज सोसायटी, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

कासवा यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरात ५ व ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान चोरट्याने घरफोडी करून ३७९ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदी तसेच २ लाख रुपये रोख असा एकूण २२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एकंदर परिस्थिती पाहता घरातील ऐवज चोरीला गेला असला तरी घरातील इतर सर्व वस्तू जागेवरच होत्या. चोरट्याने कशालाही हात लावला नव्हता.

चावीने कुलूप काढून घरात प्रवेश केल्याचे दिसत होते. त्यामुळे हे कृत्य कोणत्या तरी परिचित व्यक्तीचे असल्याचे लक्षात आले. घराची चावी ठेवणाऱ्या दोन-तीन जणांवर संशय होता. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचा वापर करून केलेल्या विश्लेषणात त्यांचा सख्खा चुलत भाऊ आशुतोष कासवा याच्यावर संशय बळावला.

तोही व्यापारी आहे; मात्र त्याच्यावर कर्ज असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कर्जाची परतफेड करण्यासाठी आपणच घरात शिरून चोरी केल्याचे त्याने मान्य केले. पोलिसांनी चोरीला गेलेले ३७९ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदी व २ लाख रुपये रोख असा एकूण २२ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल आशुतोष कासवा याच्या घरातून जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, सहायक पोलीस फौजदार राजू कदम, पोलीस हवालदार शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, पोलीस अंमलदार अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, योगेश राऊत यांनी केली.

get_footer();