आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गोळीबार करून १७ वर्षांच्या मुलाच्या खुनाचा प्रयत्न

adminuser • Political • April 9, 2026

पुणे : दीड वर्षापूर्वी श्रीपाद अनंता बनकर (वय १७) या मुलावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. या घटनेत सिंहगड रोड पोलिसांनी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्याच घटनेचा राग मनात धरून अल्पवयीन मुलांनी गोळीबार करून एका १७ वर्षांच्या मुलाचा खुनाचा प्रयत्न केल्याची घटना वडगाव येथील चरवडवस्तीत घडली. सिंहगड रोड पोलिसांनी ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

सुरज संतोष गायकवाड (वय १७, रा. जाधवनगर, वडगाव) असे गोळी लागून जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्या डाव्या मांडीमध्ये गोळी घुसली होती. ही घटना वडगाव येथील चरवडवस्तीतील मोकळ्या मैदानात ७ एप्रिल रोजी पावणे बारा वाजता घडली. या प्रकरणातील फिर्यादी आणि आरोपी हे वडगाव बुद्रुक परिसरातील रहिवासी असून आरोपी मुले दहावी आणि अकरावीमध्ये शिकत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “येता-जाताना आमच्याकडे का पाहतो?” या कारणावरून झालेल्या वादातून श्रीपाद अनंता बनकर (वय १७) याचा ३ डिसेंबर २०२४ रोजी वडगाव बुद्रुक येथे कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता.

या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला होता. त्याच वादाच्या पार्श्वभूमीवर सुरज गायकवाड आणि साहिल खान हे दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांना थांबवून “तुमचा विषय संपवतो” असे म्हणत शिवीगाळ करून लोखंडी हत्याराने मारहाण केली.

त्यानंतर आरोपींपैकी एकाने पिस्तुलातून सुरज गायकवाड याच्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. गोळी त्याच्या डाव्या मांडीत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच साहिल खान याच्यावरही गोळी झाडण्यात आली, मात्र सुदैवाने त्याला गोळी लागली नाही.

जखमी सुरज गायकवाड याला तातडीने रुग्णालयात दाखल करून त्याच्या मांडीतील गोळी काढण्यात आली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करत आहेत.

get_footer();