आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गावठी पिस्तूल बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

adminuser • Political • March 12, 2026

पुणे : मित्राकडे पार्टी करण्यासाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

सिद्धार्थ अनिल बोराडे (वय २०, रा. ज्ञानेश्वरनगर, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी कोयता बाळगून फिरत असल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तसेच पोलीस अंमलदार दीपक चव्हाण आणि सचिन जाधव यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात एक सराईत गुन्हेगार गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी माहितीची खात्री करून रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला.

बुधवारी रात्री त्या ठिकाणी आलेल्या सिद्धार्थ बोराडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. चौकशीदरम्यान त्याने मित्राकडे पार्टीसाठी आल्याचे सांगितले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तसेच पोलीस अंमलदार दीपक चव्हाण, सचिन जाधव, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, राजकिरण पवार, तायडे आणि श्रीकृष्ण सांगवे यांनी ही कारवाई केली.

get_footer();