आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कुख्यात गँगस्टर टिपू पठाण टोळीला जामीन मंजूर

adminuser • Political • February 13, 2026

पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार कुख्यात गँगस्टरांचे कंबरडे मोडण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या आर्थिक स्रोतांवर घाव घालत असताना, दुसरीकडे गँगस्टर टिपू पठाण यांच्या टोळीविरुद्ध वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे न्यायालयाने ६ जणांना जामीन मंजूर केला आहे. तसेच या निकालाची प्रत माहितीसाठी व आवश्यक त्या कारवाईसाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना द्यावी, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण, इजाज सत्तार पठाण, सद्दाम सलीम पठाण, अजीम ऊर्फ अंट्या मोहम्मद हुसेन शेख, मतीन हकीम सय्यद आणि तन्वीर शकील शेख अशा ६ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

याबाबत लॉरेन्स हॅरी स्वामी यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हडपसर येथील १२९० चौ. मी. मिळकतीवर टिपू पठाण व त्याच्या साथीदारांनी ताबा घेऊन त्यावर पत्र्याचे शेड उभारून ती भाड्याने दिली आहे.

ही जागा परत हवी असेल तर २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे या फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी टिपू पठाणसह ६ जणांना १० नोव्हेंबर २०२५ रोजी अटक केली होती. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त नम्रता देसाई यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

दरम्यान, पोलिसांनी टिपू पठाण व त्याच्या टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल केला. त्याने बेकायदेशीरपणे उभारलेल्या इमारती महापालिकेच्या मदतीने जमीनदोस्त करण्यात आल्या. संघटित टोळ्यांना ज्या मार्गातून आर्थिक रसद पुरविली जाते ते मार्ग बंद करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून, विशेषतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, सुरू आहे.

असे असताना टिपू पठाण व त्याच्या टोळीवर ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्यात पोलिसांना अपयश आले. तसेच त्यांनी वेळेत मुदतवाढ न मागितल्याने विशेष मोक्का न्यायाधीश एस. एस. कंठाळे यांनी ६ जणांना जामीन मंजूर केला आहे.

याबाबत अ‍ॅड. बिलाल शेख यांनी विशेष मोक्का न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करून सहायक पोलीस आयुक्त नम्रता देसाई यांचा मुदतवाढीचा अर्ज फेटाळून लावला. तसेच ६ आरोपींना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

आरोपींनी ३ वर्षे किंवा खटला पूर्ण होईपर्यंत पुणे शहरात प्रवेश करू नये. फक्त खटल्याच्या नियोजित तारखांना किंवा पोलिसांनी बोलावल्यास हजर राहण्याच्या उद्देशानेच पुणे शहरात येण्याची परवानगी असेल.

आरोपींनी त्यांचे राहण्याचे ठिकाण व संपर्क क्रमांक न्यायालयात सादर करावा. कोणत्याही अटीचा भंग केल्यास जामीन रद्द करण्यास पात्र ठरेल. या आदेशाची प्रत माहिती व आवश्यक कारवाईसाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना कळवावी, असे या निकालात नमूद करण्यात आले आहे.

get_footer();