आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

adminuser • Political • March 19, 2026

पुणे : हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीला भाड्याने गाड्या पुरविणार्‍या ऑटोरायडर इंटरनॅशनल या कंपनीतील कर्मचार्‍याने कंपनीच्या ऑपरेशनल व बिलिंग प्रणालीमध्ये जाणीव पूर्वक खोटे व बनावट माहितीच्या आधारे इन्फोसिस या नामावंत कंपनीच्या नावाने ९४० खोटी बिले तयार करुन कंपनीला ४२ लाख ५० हजार ९४४ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

याबाबत ऑटोरायडर इंटरनॅशनल कंपनीचे असिस्टंट ब्रंच मॅनेजर परवेझ पठाण (वय ५०, रा. दौंड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कंपनीचा ग्राहक सेवा प्रतिनिधी मुकेश धर्मपाल धिंग्रा (रा. कोयना हौसिंग सोसायटी, निगडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार कंपनीच्या बंडगार्डन रोडवरील अशोका मॉल येथील कार्यालयात २० एप्रिल २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोरायडर इंटरनॅशनल या कंपनीचे कार्यालय अशोका मॉल येथे आहे.

पुणे शहरातील व्यावसायिक कंपन्यांना भाड्याने कार पुरविण्याचे काम करते. कंपनीत १० कर्मचारी वेगवेगळ्या विभागात काम पाहतात. कंपनीने मुकेश धर्मपाल धिंग्रा याची ग्राहक सेवा प्रतिनिधी या पदावर नियुक्ती केली होती.

पुण्यातील हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीसोबत कंपनीचा गाड्या भाड्याने देण्याचा १९९७ पासून व्यावसायिक करार आहे. या करारानुसार कंपनीमार्फत इन्फोसिस कंपनी येथे ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून मुकेश धिंग्रा याची नेमणूक केली होती.

इन्फोसिस कंपनीच्या ग्राहकांना व कर्मचार्‍यांना भाड्याने लागणार्‍या गाड्या/कार यांचे कंपनीतील आय ट्रॅव्हल पोर्टलद्वारे प्राप्त करुन दररोजच्या व मासिक कार बुकिंग रिक्वेस्ट पाठवत असे. इन्फोसिस कंपनीने पाठवलेले बुकिंग रिक्वेस्ट ही त्यांचे पोर्टलवर दिसत होती.

ही बुकिंग मुकेश धिंग्रा एकत्रित करुन एक्सेल शिटमध्ये तयार करुन पुण्यातील कंपनी तसेच दिल्ली येथील रिझर्वेशन सेंटर येथे पाठवित होता. इन्फोसिस कंपनीने मागणी केलेल्या प्रत्येक गाडीच्या बुकिंगकरीता त्यांचे इन्फोसिस कंपनीकडून एक युनिक नंबर देत होती.

त्यानंतर दिल्ली रिझर्वेशन सेंटर हे पुण्यातील ऑटोरायडर कंपनीचे ऑपरेशन सिस्टम मध्ये हे बुकिंग टाकल्यानंतर कंपनीचे ऑपरेशन टीम मागणी केल्याप्रमाणे इन्फोसिस कंपनीला भाड्याने देत होते.१५ दिवसांचे एकत्रित बिल मुकेश धिंग्रा याला ई मेलद्वारे पाठवित होते.

ही बिले मुकेश धिंग्रा हा इन्फोसिस कंपनीच्या आय ट्रॅव्हल पोर्टलवर बिलाचे युनिक नंबरद्वारे अपलोड करत होता. त्यानंतर इन्फोसिस कंपनी वेळोवेळी बिल पेड करत होती. जुलै २०२५ मध्ये करण्यात आलेल्या समेट प्रक्रियेदरम्यान कंपनीच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली.

त्यानंतर एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील सविस्तर अंतर्गत चौकशी सुरु केली. त्यात हा प्रकार आढळून आला. मुकेश धिंग्रा याने ९४० बनावट बिले करुन एकूण ४२ लाख ५० हजार ९४४ रुपयांची ऑटोरायडर कंपनीची फसवणूक केल्याचे आढळून आले. सहायक पोलीस निरीक्षक हंडाळ तपास करीत आहेत.

get_footer();