आवृत्ती पुणे
← Back to Homepage

इन्फिस्को शेअर मार्केटिंग कंपनीच्या भूपेश दीक्षितविरुद्ध गुन्हा दाखल

adminuser • Political • February 13, 2026

पुणे : दर महिन्याला ४ ते १० टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची साडेआठ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या इन्फिस्को शेअर मार्केट कंपनीचे भूपेश अशोक दीक्षित याच्यावर दाखल झालेला गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

भूपेश अशोक दीक्षित (वय ४०, रा. कुमार प्रेसिडेन्सी, कोरेगाव पार्क) याने कोरेगाव पार्क येथे कार्यालय उघडून, तेथे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कशा पद्धतीने जास्तीतजास्त परतावा मिळू शकतो, असे प्रेझेंटेशन दाखवून लोकांना भुलवले. सुरुवातीला काही महिने तो लोकांना परतावा देत होता. त्यामुळे इतर लोकही त्याच्याकडे गुंतवणूक करत होते.

फेब्रुवारी २०२५ पासून लोकांना परतावा देणे बंद झाले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. शेवटी फिर्यादींसह १७ जणांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबर २०२५ रोजी ८ कोटी ३४ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उत्कर्षा देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. भूपेश दीक्षित याच्याकडून आर्थिक फसवणूक झाली असल्यास संबंधित कागदपत्रे व पुराव्यासह आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

get_footer();