आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपीकडून ड्रग्ज रॅकेटचा उलगडा

adminuser • Political • April 2, 2026

पुणे : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर गेले ८ महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला उत्तमनगर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ३ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) व दोन मोबाईल जप्त करण्यात आले. मोबाईलमधील व्यवहारांवरून या गुन्हेगाराने तब्बल २५० ते ३०० जणांना अंमली पदार्थ विकले असून, त्यातून त्याच्याकडे १० लाख रुपये आल्याचे दिसून आले. यामुळे अंमली पदार्थ विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे.

सुनील गोपाळ राठोड (वय २८), राजन गोपाल नायर (वय ३७, रा. उत्तमनगर), जतीन जयंवत कदम (वय २६, रा. वारजे) आणि शुभम संतोष दहिभाते (वय २८, रा. कोंढवे धावडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. उत्तमनगर पोलीस ठाण्यात जुलै २०२५ मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल होता.

पोलिसांनी मुलीची सुटका केली होती. मात्र, तेव्हापासून सुनील राठोड फरार होता. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांना सुनील राठोड हा सिंहगड सृष्टी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून सुनील राठोड याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ३ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) व दोन मोबाईल जप्त करण्यात आले. त्याला पोलीस ठाण्यात आणून मोबाईलची तपासणी केली असता अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट उघडकीस आले.

सुनील राठोड हा संघटितपणे अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवत असल्याचे दिसून आले. उत्तमनगर पोलिसांनी शुभम दहिभाते याला अटक केली. गुन्हे शाखेने राजन नायर आणि जतीन कदम यांना अटक केली आहे.

न्यायालयाने या आरोपींना ८ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या आरोपींकडून ८ ग्रॅम एमडीसह मोबाईल व वाहने असा २ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे, अक्षय पाटील, मुकेश कुरेवाड, पोलीस हवालदार प्रदीप शेलार, पृथ्वीराज गायकवाड, पोलीस अंमलदार चेतन बराटे, परमेश्वर पाडळे, ज्ञानेश्वर तोडकर, अनिरुद्ध गायकवाड यांनी केली आहे.

get_footer();