आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रेमप्रकरणावरून नायजेरियनांमध्ये झालेल्या वादात मित्राचा खून

पुणे : स्टुडंट व्हिसा आणि बिझनेस व्हिसावर येऊन पुण्यात राहणाऱ्या नायजेरियन तरुणांमध्ये प्रेमप्रकरणावरून झालेल्या वादात चौघांनी मित्रावर छोट्या कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

येमेकाक्रिस्टी एन (वय ३८, रा. शार्लिन अ‍ॅव्हेन्यू सोसायटी, धर्मावत पेट्रोल पंपाजवळ, पिसोळी) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी किन्सली, जॉन पॉल ओबिन्न मोनेक (ओबी) ओजेंग्वा, नायेमेका मादुबुची ओनिया (सर्व रा. पिसोळी) या चौघांना अटक केली आहे. याबाबत गिफ्ट सिव्होनस ऊटाह (वय ३९, रा. रिम्स स्कूलजवळ, वडाची वाडी, उंड्री) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार पिसोळीतील बालाजी पद्मावतीनगर, लिंमरास हाइट येथे सोमवारी पहाटे ३ वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व नायजेरियन स्टुडंट व्हिसा व बिझनेस व्हिसावर भारतात येऊन अनेक वर्षांपासून पुण्यात राहत आहेत. आरोपी आणि खून झालेला येमेकाक्रिस्टी हे फिर्यादीच्या ओळखीचे आहेत.

ते सर्व एनकेनिया पॅट्रिशिया मबिगा हिच्या पिसोळीतील लिंमरास हाइटमधील फ्लॅटवर जेवायला गेले होते. येमेकाक्रिस्टी हा त्याची मैत्रीण ग्लोरी हिच्याशी बोलल्याचे व तिच्यासोबत असलेल्या प्रेमप्रकरणावरून त्यांच्यात वाद झाला.

त्यानंतर चौघांनी संगनमत करून पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास छोट्या कुऱ्हाडीने येमेकाक्रिस्टी याच्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या येमेकाक्रिस्टी याला त्याच्या मित्रांनी रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे सकाळी ६ वाजता त्याचा मृत्यू झाला.

याची माहिती रुबी हॉल क्लिनिकने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी रुबी हॉलमध्ये जाऊन माहिती घेतली. पोलिसांनी चौघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सुतार तपास करीत आहेत.

get_footer();