आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सदाशिव पेठेत भरदिवसा ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

पुणे : ज्येष्ठ नागरिकास कोयत्याचा धाक दाखवून ‘गेम’ करण्याची धमकी देत दोघा चोरट्यांनी सदाशिव पेठेत भरदिवसा लुबाडण्याची घटना घडविली. विश्रामबाग पोलिसांनी दोघा सराईत अल्पवयीन मुलांना २४ तासांच्या आत पकडून त्यांनी लुटलेला सर्व माल हस्तगत केला आहे.

याबाबत कर्वे रोडवरील ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना टिळक रोडला लागून असलेल्या लिमयेवाडी येथील योगेश हॉस्पिटलसमोर ४ जानेवारी रोजी सकाळी पावणे दहा वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ४ जानेवारी रोजी सकाळी नातेवाईकाच्या धार्मिक विधीसाठी ओंकारेश्वर घाटावर गेले होते. तेथील कार्यक्रम संपल्यानंतर ते दुचाकीवरून घरी जात होते. लिमयेवाडी येथील गल्लीतून टिळक रोडला लागून तेथून ते घरी जाणार होते.

वाटेत योगेश हॉस्पिटलसमोरील बोळात मागून आलेल्या दोघांनी त्यांना आवाज देऊन “वजन काटा कोठे आहे?” असे विचारून थांबवले. त्यांनी “मला माहिती नाही,” असे सांगितले. तेव्हा त्यांच्यातील एकाने कमरेला कोयता असल्याचे दाखवून “हातातील अंगठी व पाकीट काढून दे, नाही तर तुझा गेम करू,” अशी धमकी दिली. त्यामुळे ते घाबरून गाडी उभी करून थांबले.

त्यांच्यातील एकाने हातातील ४ ग्रॅमची अंगठी हिसकावून घेतली, तर दुसऱ्याने त्यांच्या पँटच्या खिशातून पाकीट काढले. त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला असता, “ओरडले तर माझ्याकडे कोयता आहे, गेम करून टाकेन,” अशी धमकी देत त्यांच्या गाडीची चावी घेऊन ते पळून गेले.

चोरट्यांनी अंगठी व रोख रक्कम असा एकूण ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. विश्रामबाग पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. चोरट्यांनी तोंडाला मास्क लावलेला होता; मात्र त्यांच्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती.

त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, पोलीस निरीक्षक अरुण घोडके, सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार अर्जुन थोरात यांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्यांचा माग काढला.

चोरटे जवळपास दोन तास शहरात विविध ठिकाणी फिरले. त्यानंतर त्यांना त्यांचा एक मित्र भेटला. ते त्याला घेऊन नाश्ता करण्यासाठी गेले. या धाग्यावरून पोलिसांनी त्या मित्राची ओळख पटवली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने दोघांची नावे सांगितली.

पोलिसांनी भवानी पेठ व गंज पेठेत राहणाऱ्या दोघा अल्पवयीन मुलांना पकडले. त्यांच्याकडून चोरलेली अंगठी, रोख रक्कम व फिर्यादीच्या गाडीची चावी असा सर्व ऐवज जप्त करण्यात आला आहे. चोरट्यांपैकी एका अल्पवयीन मुलावर यापूर्वी दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर तपास करीत आहेत.

get_footer();