आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दोन वर्षांच्या मुलीचा खून करून आईची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : ते दोघेही एकमेकांचे नातेवाईक होते आणि त्यांनी परस्पर संमतीने लग्न केले होते. त्यांना एक मुलगी झाली होती. मात्र, तिच्यामध्ये जन्मतःच जेनेटिक समस्या निर्माण झाली होती. तिला अस्थीविकार होता. मुलगी दोन वर्षांची झाली तरी तिची प्रकृती नाजूकच होती. या मानसिक तणावातून आईने आपल्या दोन वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. वारजे माळवाडी येथील गोकुळनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

छाया आदिनाथ देवडकर (वय २८, रा. कारगील फार्म हाऊस शेजारी, गोकुळनगर पठार) आणि मुलगी शारवी (वय २ वर्षे ३ महिने) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी आदिनाथ संताराम देवडकर (वय ३०, रा. गोकुळनगर पठार) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिनाथ देवडकर हे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. त्यांनी नात्यात लग्न केले होते. त्यांच्या मुलीला जन्मतःच जेनेटिक समस्या आणि अस्थीविकार होता. दोन वर्षांची झाली तरी ती उभी राहू शकत नव्हती. तिच्यावर आतापर्यंत दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

त्यामुळे आपल्या मुलीचे भवितव्य कसे असेल याबाबत छाया देवडकर या सतत चिंतेत असायच्या. शुक्रवारी सकाळी आदिनाथ देवडकर हे कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले. त्यांचे घर पत्र्याचे होते. त्यांनी दरवाजा ठोठावला; मात्र आतून दार बंद असल्याने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

बराच वेळ आवाज दिल्यानंतरही दरवाजा न उघडल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने कडेचा पत्रा काढला. तेव्हा आत छाया हिने गळफास घेतल्याचे दिसून आले. छाया हिने मुलीच्या आजारपणामुळे आलेल्या मानसिक तणावातून आपल्या दोन वर्षांच्या मुलीचे हात चिकट टेपने बांधले, पाळण्याला साडीने दोरी बांधून तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कापसे करीत आहेत.

get_footer();