आवृत्ती पुणे
← Back to Homepage

होम व्हिजिटला बोलावून डॉक्टरला चाकूचा धाक दाखवून लुबाडले

पुणे : वडील आजारी असल्याचे सांगून तपासणीसाठी होम व्हिजिटला बोलावून दोघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून डॉक्टरांना मारहाण करून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुणे-सातारा रोडवरील अथर्व फरिहाज बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सव्वानऊ वाजता घडली.

याबाबत धनकवडी येथील एका ४९ वर्षांच्या डॉक्टरांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघा चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एमबीबीएस डॉक्टर असून धनकवडीत त्यांचे क्लिनिक आहे.

ते होम व्हिजिटही करतात. त्यांना एका फोनवरून वडील आजारी असल्याचे सांगून पुणे-सातारा रोडवरील अथर्व फरिहाज बिल्डिंगमध्ये तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. ते या इमारतीच्या पार्किंगमध्ये गेले असता दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्याला चाकू लावला व डाव्या हाताच्या बोटाला चाकू मारून जखमी केले.

दुसऱ्याने त्यांची मोपेड, मोबाईल, सॅक व त्यामधील ३० हजार रुपये रोख तसेच १ लाख रुपयांचा ७०० ग्रॅम वजनाचा चांदीचा जग अशा वस्तू जबरदस्तीने चोरून नेल्या. पोलीस उपनिरीक्षक सद्दाम फकीर तपास करीत आहेत.

get_footer();