आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सोरतापवाडीच्या महिला सरपंचासह मुलाला अटक

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावाच्या महिला सरपंच सुनिता चौधरी व त्यांचा मुलगा रोहन कारभारी चौधरी यांना उरुळी कांचन पोलिसांनी अटक केली आहे. सुनेचा हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीप्ती रोहन चौधरी (वय ३०, रा. सोरतापवाडी) असे आत्महत्या केलेल्या सुनेचे नाव आहे. तिला तीन वर्षांची मुलगी आहे. दीप्ती चौधरी ही इंजिनीअर होती. सरपंच सुनिता कारभारी चौधरी, पती रोहन कारभारी चौधरी, दीर रोहित कारभारी चौधरी आणि सासरे कारभारी चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सरपंच सुनिता चौधरी आणि त्यांचा मुलगा रोहन कारभारी चौधरी यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
याबाबत दीप्तीच्या आईने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली हगवणे हिचा पैशांसाठी छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आले होते. राज्यात हे प्रकरण गाजले असतानाच सोरतापवाडीत असाच प्रकार पुन्हा घडला आहे.

सोरतापवाडीतील कड वस्ती परिसरात महिला सरपंच सुनिता चौधरी राहतात, तर सासरे कारभारी चौधरी हे शिक्षक आहेत. दीप्तीचा रोहन चौधरी याच्याशी २०१९ मध्ये विवाह झाला होता. विवाहाच्या वेळी ५० तोळे सोन्याचे दागिने आणि गाडीसाठी २५ लाख रुपये देण्यात आले होते.

विवाहानंतर काही दिवसांतच माहेरून पैसे आणण्याची मागणी सासरच्या मंडळींकडून सुरू झाली होती. तिला पहिली मुलगी झाल्याने सासू-सासरे नाराज होते. त्यानंतर जून २०२५ मध्ये ती पुन्हा गर्भवती असताना त्यांनी बेकायदेशीरपणे गर्भलिंग तपासणी केली.

तिच्या पोटात मुलगी असल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा सासू व सासऱ्यांनी “आम्हाला आमच्या वंशाला दिवा हवा आहे,” असे म्हणून तिच्यावर जबरदस्ती करून गर्भपात घडवून आणला होता. वेळोवेळी पैसे देऊनही दीप्तीचा छळ सुरूच होता.

हुंडा दिल्यानंतरही तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यात येत होता. मानसिक दबाव आणि शारीरिक छळ असह्य झाल्याने अखेर दीप्तीने शनिवारी, २४ जानेवारी रोजी सायंकाळी आपल्या तीन वर्षांच्या मुलीसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे तपास करीत आहेत.

get_footer();