आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सुवर्ण कारागिराला डांबून ठेवणाऱ्या दुकानदाराला अटक

पुणे : गेल्या पाच वर्षांपासून काम करणाऱ्या सुवर्ण कारागिराने २०२४ पासून जमा झालेला पगार आणि कामाचे सोने मागितल्याने दुकानमालकाने त्याला डांबून ठेवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दुकानमालकाला अटक केली आहे.

सुखदेव दास (वय ३८, रा. विटेकर बिल्डिंग, गणेश पेठ) असे अटक करण्यात आलेल्या दुकानमालकाचे नाव आहे. याप्रकरणी अरिफ नासिम मंडल (वय २७, रा. विटेकर बिल्डिंग, गणेश पेठ) या सुवर्ण कारागिराने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२१ पासून आतापर्यंत गणेश पेठेतील विटेकर बिल्डिंग येथे घडत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरिफ मंडल हा गंठण बनविण्याचे काम करणारा सुवर्ण कारागीर असून तो २०२१ पासून सुखदेव दास यांच्याकडे काम करत होता. सराफांकडून आलेल्या ऑर्डरप्रमाणे दास हे कारागिरांकडून दागिने बनवून घेत होते. मंडल हे काम करत असतानाच त्या ठिकाणी राहत होते.

२०२४ मध्ये फिर्यादी अरिफ मंडल आणि त्यांच्या भावाने खात्यावर जमा असलेले कामाचे सोने व पगार मागितला असता, सुखदेव दास याने उलट त्यांच्यावर कामाच्या सोन्यातून २५५ ग्रॅम सोने चोरल्याचा खोटा आरोप केला. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यासोबतच फिर्यादीच्या आई-वडिलांनाही धमकावून त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

२०२४ पासून आजपर्यंत फिर्यादीच्या कामापोटी सुमारे २४० ग्रॅम सोने आणि ३ लाख ५० हजार रुपये पगार जमा असतानाही दास याने तो देण्यास नकार दिला. उलट फिर्यादी व त्यांच्या भावाचे मोबाईल काढून घेऊन त्यांना डांबून ठेवले.

अरिफ मंडल यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी भेट देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. फरासखाना पोलिसांनी सुखदेव दास याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();