पुण्यात होणार नवकार महामंत्राचे भव्य पठण
२५ हजार भाविकांच्या उपस्थितीत ‘विश्व नवकार दिवस’ होणार साजरा
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : संपूर्ण विश्वाच्या शांती, सद्भावना आणि सकारात्मक ऊर्जेसाठी ९ एप्रिल २०२६ रोजी पुण्यात भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) पुणे चॅप्टरच्या वतीने, जितो पुणेच्या ॲडव्हायजरीच्या सानिध्यात तसेच अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल आणि सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या ग्राउंडवर सकाळी ७ वाजता पार पडणार आहे.
हा उपक्रम केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी, शांती आणि सौहार्दाचा संदेश देणारा आहे. मोठ्या प्रमाणावर सामूहिक पठणातून सकारात्मक ऊर्जा निर्माण करून विश्वशांतीचा संदेश देण्याचा यामागील उद्देश आहे.
गेल्या वर्षीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा हा कार्यक्रम अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. सुमारे २५,००० भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यानुसार सर्व व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाबाबत सर्व स्तरांत उत्साहाचे वातावरण आहे.
या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी जितो पुणेचे सह-सेक्रेटरी ॲडव्होकेट विशाल शिंगवी, खजिनदार दिलीप जैन, सह-खजिनदार रुपेश कोठारी, अमोल कुचेरिया तसेच उपाध्यक्ष विशाल चोरडिया, अजय मेहता, विनोद मांडोत आणि चेतन भंडारी यांच्यासह सर्व पदाधिकारी संयुक्तपणे पार पाडत आहेत.
या भव्य ‘विश्व नवकार दिवस’ उपक्रमाद्वारे पुणे शहरातून संपूर्ण जगाला शांती, एकता आणि सद्भावनेचा प्रभावी संदेश दिला जाणार आहे।
विशाल जर्मन हॅंगर मंडप ठरणार
आकर्षणाचा केंद्रबिंदू – कार्यक्रम स्थळी १५५ × ४०० चौ. फूटाचा विशाल जर्मन हॅंगर मंडप उभारण्यात येत असून, तो या सोहळ्याचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या भव्य मंडपामध्ये हजारो भाविकांसाठी आरामदायी बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात येणार आहे.
“कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, विशेषतः उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी १५५ × ४०० चौ. फूटाचा विशाल जर्मन हॅंगर मंडप उभारण्यात येत आहे. या सामूहिक पठणातून संपूर्ण विश्वात शांती, सौहार्द आणि सकारात्मक ऊर्जा पसरावी, हीच आमची भावना आहे.” – इंद्रकुमार छाजेड़, चेयरमैन, जीतो पुणे चॅप्टर
