आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आरोग्य उपसंचालकांसाठी ३ लाख रुपयांची लाच घेताना आरोग्य सेवक जाळ्यात

पुणे : नियुक्तीसाठी आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांना ३ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून ३ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवकाला रंगेहाथ पकडले.

रामकिसन गंगाधर घ्यार (वय ४४, रा. सरकारी निवासस्थान, आरोग्य केंद्र, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोग्य सेवकाचे नाव आहे.तक्रारदार हे आरोग्य सेवक असून त्यांची जून २०२५ मध्ये कोल्हापूर मंडळातून पुणे मंडळात उपसंचालक आरोग्य विभागात बदली झाली. त्यांना कोल्हापूर येथून कार्यमुक्त करण्यात आले होते.

पुण्यात बदली होऊन आल्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बावडा येथील रिक्त जागेवर नियुक्ती मिळावी, असा विनंती अर्ज सादर केला होता. मात्र, जूनपासून त्यांना नियुक्ती न मिळाल्याने त्यांना पगार मिळत नव्हता.

याबाबत त्यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची भेट घेऊन नियुक्ती देण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी रामकिसन घ्यार यांची भेट घेण्यास सांगितले. डॉ. भगवान पवार आणि रामकिसन घ्यार यांचा नियमित संपर्क असल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. त्यानंतर तक्रारदार यांनी रामकिसन घ्यार यांची भेट घेतली. त्यांनी मागितलेल्या ठिकाणी बदली करण्यासाठी डॉ. भगवान पवार यांच्यासाठी ३ लाख रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदारांनी २ डिसेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी ४ आणि ५ डिसेंबर रोजी करण्यात आली. त्यात रामकिसन घ्यार यांनी तक्रारदारांच्या बदलीच्या कामासाठी आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यासाठी ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे डॉ. भगवान पवार यांची पडताळणी करणे आवश्यक होते. मात्र, पडताळणीदरम्यान डॉ. पवार यांनी थेट लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले नाही. मात्र रामकिसन घ्यार यांनी लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने प्रत्यक्ष कारवाईचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर सापळा रचला. तक्रारदारांकडून ३ लाख रुपये स्वीकारताना रामकिसन घ्यार याला रंगेहाथ पकडण्यात आले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून रामकिसन घ्यार याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक आशावरी शेडगे तपास करीत आहेत.

get_footer();